गोविंद विनायक करंदीकर | |
---|---|
जन्म नाव | गोविंद विनायक करंदीकर |
टोपणनाव | विंदा, विंदा करंदीकर |
जन्म | ऑगस्ट २३, १९१८ [धालवली ], सिंधुदुर्ग |
मृत्यू | मार्च १४,२०१० मुंबई,महाराष्ट्र. |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | कवी, समीक्षक |
साहित्य प्रकार | कविता, बालसाहित्य, अनुवादित साहित्य, समीक्षण,विरूपिका |
विषय | मराठी |
प्रसिद्ध साहित्यकृती | अष्टदर्शने, स्वेदगंगा |
वडील | विनायक हरी करंदीकर |
पत्नी | सुमा गोविंद करंदीकर (कु .कुसुम दामले ) |
अपत्ये | आनंद (नंदू ) , उदय , सौ .जयश्री काळे |
पुरस्कार | ज्ञानपीठ पुरस्कार, कबीर सन्मान, |
गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर'(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते.
देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला.[१]वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.
विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणातपोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत.
अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले.
त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली.
विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर या लेखिका होत्या. त्यांना एक मुलगी सौ .जयश्री विश्वास काळे आणि आनंद आणि उदय असे दोन मुलगे आहेत.
विंदांना इ.स. २००३ साली बेचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
[२] त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा असे त्यांनी सुचविले होते.[३]
विंदांनी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली.
विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला.
शैलेश त्रिभुवन)
लाभसेटवार साहित्य पुरस्कार (२००२)
महाराष्ट्र सरकार २०११सालापासून साहित्यिकांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देते.
विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो.
कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते. तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकांची मिस्किल नजर यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी असेच तिचे रूप आहे.
निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला सुरूप देण्यात ती जशी रंगून जाताना दिसते तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वरवर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते. ती कधी चित्रमयी बनते, कधी कोड्याच्या भाषेत बोलते, तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो. तिचे रूप न्यारे आहे. व्यक्तित्व आगळे आहे. तिचा रोख झोक नोक सर्व तिचा आहे.
ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते.
“ | विंदांच्या 'मृ्द्गंध' या पॉप्युलर प्रकाशनाने १५ डिसेंबर १९५४ ला प्रसिद्ध केलेल्या पहिल्या आवृत्तीच्या मलपृष्ठावरून | ” |
विजया राजाध्यक्ष यांनी ग्रंथाली प्रकाशनाकरीता विंदाशी केलेल्या संवादात विंदा आजच्या समकालीन मराठी साहित्याबद्दल म्हणतात, "वाचकांचे अनेक थर आहेत, यातला कोणताही एक थर वंचीत ठेवणे हे पाप आहे.
अशी कल्पना करा की, वाड्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते. त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहीजेत." हे म्हणतानाच विंदा मराठी साहीत्यात पुरेसे महावृक्ष नसल्याबद्दल खंतही व्यक्त करतात.
मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांत - "करंदीकरांची कविता प्रयोगशील आहे. त्यांचे सामाजिक, राजकीय तत्त्वज्ञान मार्क्सिस्ट संस्कारांचे होते. त्यामुळे प्रचाराचे बांडगूळ टाळून सामाजिक, राजकीय कविता लिहिणे कठीण होते पण विंदामधल्या कलावंताने हे आव्हान यशस्वीपणे पेलले.
त्याच्या कवितेची शैली ही वक्तृत्वपूर्ण आहे. पण तरीही ती भाषणबाजी करीत नाही. करंदीकरांची प्रकृती ही तेचतेच दळण यशस्वीपणे दळत राहणाऱ्या माणसाची नाही. तो सतत काहीतरी नवीन शोधत असतो. नव्या अनुभवांना भिडत असतो. काहीवेळा छंदाची मोडतोड करूनही आपला वेगळा छांदिष्टपणा प्रकट करीत असतो. करंदीकरांमध्ये जसा एक कवी आहे तसाच एक तत्त्वचिंतकही आहे. कविता, ललित निबंध, समीक्षा, इंग्रजीतील मौलिक ग्रंथांची भाषांतरे अशा विविध अंगांनी करंदीकरांनी थोर साहित्यसेवा केली आहे.
तेव्हा त्यांना मिळालेले 'ज्ञानपीठ' हे या सेवेसाठी व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे."
शंकर वैद्य (कविता-रती दिवाळी अंक-२००५) यांच्या मते विंदा करंदीकरांची जीवनविषयक दृष्टी ही कठोर बुद्धिवादी, पूर्णपणे वास्तवशील आणि नितांत ऐहिक स्वरूपाची आहे.